शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

वाशिमच्या पोहरगड तीर्थस्थानी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा 

admin-ajax.php
पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण, भाविकांची आर्थिक लूट
मुंबई / प्रतिनिधी :
देशभरातील सात कोटी भटक्या विमुक्त जाती जमातींचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मनोरा तालुक्यातील पोहरागड हे तीर्थक्षेत्र आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचे प्रसिद्ध समाधीस्थळ आहे. दरवर्षी या ठिकाणी विविध राज्यातून 5 ते 6 लाख भाविक येत असतात. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या या पर्यटन स्थळापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र, याठिकाणी आपल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्याने तेथून मिळणारे सारे उत्पन्न खासगी बसांना मिळते. तसेच येथे दर्शनासाठी येणाऱया भाविकांनाही त्रास सहन करावा लागतो.
पोहरागड येथे आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून भाविक येतात. या सर्व भाविकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्यामुळे खासगी बसने प्रवास करावा लागतो. इतर राज्यांप्रमाणेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागांतूनही पोहरागडला जाणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र, या पर्यटनस्थळापासून मिळणाऱया महसूलापासून राज्य परिवहन मंडळ वंचित राहत आहे. या मार्गावर राज्य परिवहन मंडळाने नियमित बस सेवा सुरू केल्यास भाविकांची सोय होऊन राज्य परिवहन मंडळालाही त्याचा फायदा होऊ शकतो.
 पोहरागडच्या बाजूला उंबरीगड येथे जेतालाल महाराज यांची समाधी आहे. त्याच परिसरात सवाईराम महाराज, प्रल्हाद महाराज, सामकी माता आदींचे देवस्थान असून, तेथे शेकडो भक्त येत असतात. या मार्गावरही नियमित बस सेवा असल्यामुळे भाविकांची आर्थिक लूट होते. तसेच येथून अनेक भाविक माहुरगड येथील रेणुका माताच्या दर्शनासाठीही जातात. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱया बससेवा, बसस्थानक आणि राज्य, परराज्यांतील भाविकांसाठी सुरू कराव्यात अशी मागणी भाविकांकडून होत आहे. राज्य सरकारने या भागाचा विकास करावा. तसेच त्यासाठी निधी राखून ठेवावा, याचा विचार होणे आवश्यक आहे.

Related posts:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा